Breaking News Ahilyanagar: महंत सोमेश्वर महाराज यांचा उपक्रम, ५ हजारांवर भक्त.
दहिगावने : मानवी मनावरील संस्कार, तसेच भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यात वारकरी संप्रदायाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. मात्र, अलीकडच्या काळात पाश्चात्य संस्कृतीच्या विळख्यात भारतीय तरुणाई अडकत असल्याचे वास्तव आहे. अशा वातावरणात दमडीचीही अपेक्षा न करता हनुमान चालीसा पाठच्या माध्यमातून हनुमान भक्त घडवण्याचे कार्य महंत सोमेश्वर महाराज गवळी करीत आहेत.
बऱ्हाणपूर (ता. शेवगाव) येथील वैष्णव सेवा आश्रमात वास्तव्य करणारे सोमेश्वर महाराज पूर्ण वेळ भक्तिप्रसाराचे कार्य करीत असतात. गणपती आव्हाने येथून २५ हनुमान भक्तांच्या साथीने २०२३ साली त्यांनी हनुमान चालीसा उपक्रम सुरू केला. आज ४० गावांमधून ५ हजारांपेक्षा अधिक हनुमान भक्त घडले आहेत, ज्यांच्या हनुमान चालीसा मुखोद्गत आहे.
वारकरी शिक्षण संस्थेत ४ वर्षाचे शिक्षण घेऊन सोमेश्वर महाराज गवळी हे स्वामी भारतानंदगिरीजी महाराज यांच्याकडील वेदांत साधनास्थळी लाडेवडगाव (जि. बीड) येथे पुढील अध्ययनासाठी गेले. मोरारजी बापू यांच्याकडे रामचरित मानस कंठस्थ करून परीक्षा दिली. अध्यात्माचे धडे घेऊन आज सोमेश्वर महाराज स्वामी भारतानंदगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने ते गावोगावी हनुमान चालीसा पठण उपक्रम राबवतात. सुरुवातीच्या काळात १ गाव, २५ साधक असा सुरू झालेला त्यांचा प्रवास ४० गावे आणि ५ हजारांपेक्षा अधिक साधक इथपर्यंत येऊन ठेपला आहे.
छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे आदी जिल्ह्यांतील अनेक गावांतील भाविकांना महाराजांना संपर्क केला असून, पुढील वार्षिक सोहळ्यापर्यंत १०० आणि ११ हजारांपेक्षा अधिक साधक तयार करण्याचे त्यांचे ध्येय आहे. दरवर्षी या हनुमान चालीसा उपक्रमाचा वार्षिक सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करून पुढील वर्षाच्या कार्याची ऊर्जा साधकांना देत असतात. यावर्षीचा हा सोहळा नेवासा तालुक्यातील नजिक चिंचोली येथे शनिवारी (दि. ३) होणार असून, स्वामी भारतानंदगिरीजी महाराज मार्गदर्शन करणार आहेत.
ना मानधन, ना प्रवास खर्च
सोमेश्वर महाराज गवळी हनुमान चालीसा उपक्रमासाठी गावात सलग तीन दिवस जातात, तेव्हा ते कोणत्याही भाविकाच्या घरी जात नाहीत. मंदिरातच वास्तव्य करतात. या उपक्रमाचे कोणतेही मानधन स्वीकारत नाहीत. प्रवासाचा खर्चही घेत नाहीत. गावातील हनुमान मंदिरात नित्यनेमाने हनुमान चालीसा पठण घडावे, त्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडावी, इतकीच त्याची माफक अपेक्षा आहे. या कार्यात त्यांना नीलेश महाराज वाणी यांची साथ असते.
Breaking News: Reciting Hanuman Chalisa is creating a cultured generation














