Breaking News | Ahilyanagar | saints: संत हे ईश्वर स्वरूप असतात परंतु संत महात्मे आहेत तोपर्यंत समाजाला कळत नाही. संत संगतीत मानवी जीवनाचे कल्याण आहे, असे प्रतिपादन हभप ज्ञानेश्वर महाराज बटुळे शास्त्री यांनी केले.
निंबेनांदुर : संत हे ईश्वर स्वरूप असतात परंतु संत महात्मे आहेत तोपर्यंत समाजाला कळत नाही. संत संगतीत मानवी जीवनाचे कल्याण आहे, असे प्रतिपादन हभप ज्ञानेश्वर महाराज बटुळे शास्त्री यांनी केले.
शेवगाव येथील खंडोबा नगर येथे संत भगवान बाबा व संत वामनभाऊ महाराज पुण्यतिथी निमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी देव वसे चित्ती, त्यांची घडावी संगती, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, हा संत तुकाराम महाराजांचा अभंग सोडविला.
महाराज पुढे म्हणाले की, संत जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंताकडे प्रार्थना करतात की, देवा तुला द्यायचंच असेल तर, ज्याच्या चित्तात भगवंत राहतो. अशा संत महात्म्याची मला संगत दे, हीच माझी आवड आहे कारण, संत संगतीतच मानवी जीवनाचा उद्धार आहे. संत मानवी जीवनाचे कल्याण करतात. संत महात्मे जन जड जीवांचा उद्धार करण्याकरता पृथ्वीतलावर येतात व आपलं काम झालं की निघून जातात. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, संत ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये रेडा आला माऊलीने त्यांचा उद्धार केला. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या संगतीमध्ये, पुरणपोळी खाण्याच्या निमित्ताने गावबा महाराज आले. संत नाथ महाराजांनी त्याचा उद्धार केला. अर्धा क्षण संताच्या संगतीत गेला तरी मनाला शांती भेटते.
संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या संगतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले आज संपूर्ण देशामध्ये त्यांचं नाव व कीर्ती झाली. संतांची संगत सगळ्यात श्रेष्ठ आहे. संत भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न संत होऊन गेले. ज्यांनी पुण्य केलं त्यांचीच पुण्यतिथी होते. संत भगवान बाबांनी, गावोगावी जाऊन अज्ञानी लोकांना ज्ञानी करण्याचे काम केले. भक्ति मार्गामध्ये आणण्याचे पवित्र कार्य केले. संत भगवान बाबा थोर समाज सुधारक होऊन गेले. त्यांनी अध्यात्म बरोबरच शिक्षणाला महत्त्व दिले. स्वतः शाळा वस्तीगृह सुरू करून गोरगरीब विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम केले.
या प्रसंगी मृदुंगाचार्य हभप कृष्णा महाराज धस, गायनाचार्य हभप तेजस महाराज नरवडे, गायनाचार्य हभप भागवत महाराज मरकड, पुंडलिक महाराज लव्हाट, महेश महाराज नरवडे, घाडगे महाराज, झिरपे महाराज उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संत भगवान बाबा सेवा मंडळ यांनी परिश्रम घेतले.
Breaking News: Welfare of human life in the company of saints














